Diwali-Greetin-Marathi

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते |
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते ||


सस्नेह नमस्कार,
हिंदू संस्कृतीत दिवाळीला विशेष महत्व लाभलेलं आहे, प्रभू रामचंद्र जेव्हा रावणावर विजय मिळवून सीता मातेला रावणाच्या लंकेतून सोडवत अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्यावासीयांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी सजवली होती. तेव्हापासून हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली, असं म्हणतात.

दिवाळीचा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाची मात आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानलं जातं. आयुष्यातील प्रत्येक दिवस त्या दिवसासारखा असावा असं वाटतं. परंतु गेली दोन वर्ष निर्बंधांमुळे आपल्याला हा सण तणावाखाली साजरा करावा लागला होता.

पण महाराष्ट्रात युती सरकार सत्तेत आलं आणि शिंदे-फडणवीस सरकारमुळे आपल्याला हिंदू धर्मियांचे सर्व सण - उत्सव साजरे करण्यासाठी मोकळीक मिळाली आहे. ज्याप्रमाणे आपण दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले; त्याचप्रमाणे दिवाळीदेखील अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी करूयात.

गेले वर्ष अतिशय क्रियाशील असे होते. आपण भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त भारतभर “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा केला. त्यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देखील “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबवित राष्ट्रध्वजासोबत आपले छायाचित्र काढण्याचे आवाहन केले; आणि त्या तिरंग्यासोबतच्या छायाचित्रांच्या माध्यमातून “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” केला आहे. याबद्दल मी सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, कर्मचारी यांचे आभार व्यक्त करतो.

पुणे शहर भाजपच्या संघटनेच्या बाबतीत बोलायचे झाले तर, “अटलशक्ती महासंपर्क अभियान” यशस्वीपणे राबवून कार्यकर्त्यांनी पक्ष कार्याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. या अभियानांतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबवविलेल्या लोकोपयोगी योजना तसेच पुणे महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती पुणेकरांपर्यंत पोहचवली. जवळपास दीड लाख घरांहून अधिक आणि सहा लाखांहून जास्त मतदारांपर्यंत संपर्क साधणारे हे विक्रमी अभियान ठरले. पक्ष संघटनेतील स्थानिक नेते, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते या सर्वांच्या सहभागाने आणि गृहमंत्री माननीय श्री. अमितभाई शाह, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने हे सध्या झाले. त्याबद्दल सर्वांचे आभार.

आगामी वर्षात याहूनही मोठे विक्रम प्रस्थापित करण्याच्या आणि पक्ष संघटनेत काम करण्याच्या विशाल संधी सर्वांना प्राप्त होवोत ह्या सदिच्छा. ही दिवाळी आपणांस व आपल्या परिवारास भरभराटीची, सुख-समृद्धीची, आरोग्याची, आनंदाची आणि वैभवाच्या दीपमाळांनी जीवन लखलखीत करणारी जावो ह्या मनोकामना..!

सर्वांना दिवाळीच्या पुन्हा खूप साऱ्या शुभेच्छा !!
शुभ दिवाळी !
धन्यवाद..!
-- राजेश पांडे