Pune Book Festival

पुणेकरांना हेवा वाटावा असा आगळा: पुणे पुस्तक महोत्सव

पुण्याला समृद्ध वारसा आहे. हा वारसा शिक्षण, उद्योग, क्रीडा, संरक्षण, शेती अशा विविध क्षेत्रांमध्ये आहे. कला आणि साहित्य क्षेत्रातील पुण्याचा वारसा इतका संपन्न, की या महानगराची ओळख महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही आहे.

संत ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम, जिजाऊ आईसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासूनची सात शतकांची अपूर्व परंपरा पुण्याला आहे. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीमाई फुले यांनी या परंपरांना पुढे नेले. महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर...अशी किती नावे घ्यावीत, ज्यांनी पुण्याला तेज दिले. पु. ल. देशपांडे, रा. चिं. ढेरे अशा कित्येकांनी या तेजामध्ये भर टाकली...नावांची यादी करायचीच झाली, तर पानेच्या पाने भरतील...

समृद्ध वारश्याचे पुढचे पाऊल
या साऱ्या नावांमध्ये एक समान सूत्र आहे. ते आहे लेखनाचे. या साऱ्यांनी लेखन केले. या साऱ्यांचे लेखन पुण्याने वाचले. पुण्याने जे वाचले, ते महाराष्ट्राने वाचले. देशाने वाचले. महाराष्ट्राच्या, देशाच्या विचाराला पुण्याच्या लेखनाने-वाचनाने एक आकार दिला. लेखन-वाचनाचे पुण्याचे नाते असे शतकानुशतके चालत आले आहे. पुण्याएवढा पक्का वाचक देशात अन्यत्र क्वचितच आढळेल. पुण्याच्या संपन्न अशा वाचन वारश्याला नवे कोंदण लाभले ते पुणे पुस्तक महोत्सवाचे. पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासत झाला नाही, असा विशाल पुस्तक महोत्सव १६ ते २४ डिसेंबर २०२३ या काळात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता.. स्वतंत्र भारताच्या नागरिकांना वाचनाची सवय लावणारी नॅशनल बूक ट्रस्ट या ६७ वर्षांच्या संस्थेने हा महोत्सव भरवला. एखाद्या शहराचा समृद्ध, संपन्न वारसा पुढे नेण्यासाठी त्याच तोडीची संस्था सोबत यावी, हा योगायोग नव्हे; तर ती पुण्याने कमावलेली पुण्याई आहे.

हजारो पुस्तके भेटीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका यांसह विविध क्षेत्रातील संस्था-संघटना पुणे पुस्तक महोत्सवासाठी एकवटल्या. हा महोत्सव केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल बूक ट्रस्टचा न राहता पुणेकरांचा झाला. महोत्सव पुण्यात भरवण्याचा प्रस्ताव झाल्यापासून गेल्या काही आठवड्यांत अक्षरशः शेकडो संस्थांचे मोहोळ महोत्सवाभोवती जमा झाले. लोकसहभागाचे विक्रमी शिखर पुणे पुस्तक महोत्सवातून जगासमोर उभे राहिल्यास आश्चर्य वाटू नये, इतका अफाट प्रतिसाद आयोजनापासूनच मिळत गेला. नॅशनल बूक ट्रस्ट ५५ भारतीय भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करते. या संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची संख्या हजारो आहे. ही सारी पुस्तके पुणेकरांच्या भेटीला या निमित्ताने आली.
हा महोत्सव होता; पुस्तकांचे प्रदर्शन नव्हे. महोत्सव म्हणजे महा-उत्सव. आनंद, जल्लोष, विलक्षण उर्जा, सकारात्मकता उत्सवांमधून वाहात असते. पुण्यात या महोत्सवाच्या निमित्ताने ही उर्जा अनुभवायला मिळाली. लाखो पुणेकर, हजारो कुटुंबे मुला-बाळांसह महोत्सवात सहभागी झाली. पुस्तकांचे वाचन, घरच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची खरेदी, उत्तम वक्त्यांची भाषणे, आठवणींचा भाग बनवण्यासाठीचे सेल्फी पॉईंटस्, लहान मुलांसाठी विविध कला-गुण संपन्नतेसाठी मान्यवरांचे मार्गदर्शन अशा एक ना अनेक गोष्टी महोत्सवाने पुणेकरांसमोर सादर केल्या आणि त्यांचा भरभरून आस्वाद पुणेकरांनी घेतला. भारताच्या इतर कुठल्याही शहरात कमी जाणवणारी वाचनसंस्कृती पुणेकरांनी देशासमोर सादर केली आहे. जनभागीदारीचे हे अतुलनीय उदाहरण.

महोत्सवाचे आयोजक
या महोत्सवाची संकल्पना आखली गेली ती पुण्यात जी २० एज्युकेशन वर्किंग ग्रुपची बैठक सुरु होती तेव्हा. या परिषदेला आलेल्या नॅशनल बुक ट्रस्टच्या अध्यक्ष आणि संचालकांसमोर पुण्यातल्या प्रदर्शनाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी या प्रस्तावाला होकार कळवला. फक्त आयोजन नाही तर एनबीटीचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद मराठे आणि एनबीटीचे संचालक कर्नल युवराज मलिक या साहित्याविषयी अपरंपार जाण असलेल्या व्यक्ती आणि भाषा संस्कृतीची उत्तम जाण असलेल्या प्रशासकांची साथ या निमित्ताने लाभली.

पुणेकरांची जनभागीदारी

  • पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने जनभागीदारीचे प्रचंड मोठे उदाहरण देशासमोर उभे केले. एखादा महोत्सव आयोजक-संयोजकांकडून लोकांकडे व्हावा आणि पूर्ण शहराचा व्हावा, याचे हे उत्तम उदाहरण.
  • पुण्यातल्या प्रत्येक भागात महोत्सवानिमित्त लोकजागराचे उपक्रम झाले. ज्ञानदिंड्या आल्या. रस्तोरस्ती लोकसहभागासाठी पुणेकर उत्साहाने पुढे आले. रस्त्यांवर, शाळा-कॉलेजांमध्ये, ऑफिसांमध्ये, रिक्षा थांब्यांवर, सिटी बसमध्ये, मेट्रोमध्ये लोक वाचन करत आहेत, असे दृश्य जगाने १४ डिसेंबरला पाहिले. शांतता, पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम अभूतपूर्व ठरला. हजारो पुणेकरांनी तासभर वाचन केले आणि वाचनसंस्कृतीचा संपन्न वारसा दाखवून दिला.

संयोजन समिती

  • पुणे पुस्तक महोत्सव जनभागीदारीचे सर्वोत्तम उदाहरण बनले आहे, याचे कारण पुणेकरांच्या व्यापक सहभागातून तयार झालेली संयोजन समिती.
  • सर्व वयोगटातील, सर्व संस्थांनी परिपूर्ण, सर्व विचारधारांना सोबत घेऊन संयोजन समितीची रचना त्यांनी निर्माण केली. त्यामुळे, हा पुस्तक महोत्सव पुणेकरांचा बनला. या संयोजन समितीने अनेक बैठका घेऊन छोट्या-मोठ्या उपक्रमांची आखणी केली. महोत्सवासाठी तन-मन-धन आणि वेळ अर्पून काम केले.
  • पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यासह अनेक संस्था, संघटनांनी आयोजक-संयोजन म्हणून मेहनत घेतली. फर्ग्युसन महाविद्यालयाने मुक्तहस्ताने मोठे मैदान यासाठी उपलब्ध करून दिले आहे.

महोत्सवातील विश्वविक्रम
जनभागीदारीतून अनेकानेक नवे विश्वविक्रम नोंदविले गेले. या विश्वविक्रमांची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली. एखाद्या महोत्सवाने चार-चार विश्वविक्रम नोंदवावेत, हाही एकप्रकारचा विक्रमच. यात

  • पालक-बालक गोष्टी वाचून दाखविण्याचा विक्रम – ३,०६६ पालकांनी मुलांना गोष्टी वाचून दाखविल्या.
  • ७,५०० संतांच्या ग्रंथांनी "भारत" हा शब्द साकारला
  • मोदींच्या १८, ७५१ "Exam Warrior" या पुस्तकाने "जयतू भारत" साकारले
  • ११,०४३ लोकांनी ३० सेकंद श्रीराम कथेचा उतारा वाचण्याचा विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मधून वाचनाचा संदेश वारंवार दिला होता. वाचन संस्कृतीचा पुरस्कार केला. रिड इंडियासारखी मोहिम देशाला दिली.
  • पंतप्रधानांचा संदेश पुणे पुस्तक महोत्सवाने प्रत्यक्ष कृतीत उतरविला. प्रत्येक विश्वविक्रम, प्रत्येक उपक्रम पंतप्रधानांच्या संदेशाचे कृतीत रुपांतर करणारे आहेत.
आता प्रयत्न असणार आहे तो हा महोत्सव दरवर्षी डिसेंबर महिन्यात पुण्यात व्हावा आणि एनबीटीचे केंद्र पुणे शहरात व्हावे यासाठी.