Ikigai

"'मनाच्या कोपऱ्यात खोलवर रेंगाळलेलं पुस्तक : 'इकिगाई' "

काही पुस्तकं वाचून संपत नसतात; ती मनात रेंगाळत राहतात. हळूहळू आपल्यात भिनत राहतात. पुस्तक कधीचच वाचून झालेलं असतं आणि तरीही कित्येक महिन्यांनी लक्षात येतं, की आपण मधल्या काळात इतकी पुस्तकं वाचली, तरी ते विशिष्ट पुस्तक अजूनही मनात रेंगाळते आहे.

अलिकडच्या काळात मनात असंच रेंगाळलेलं पुस्तक म्हणजे इकिगाई. तुमच्यापैकी अनेकांनी वाचलं असेलही. पुस्तक आवडण्यासाठी तुमच्यापैकी अनेकांची कारणे वेगवेगळी असतीलही; पण एका मुद्द्यावर आपलं एकमत जरूर होऊ शकतं! तो मुद्दा म्हणजे, इकिगाई वाचल्यानंतर तुमच्याही मनात ते पुस्तक कुठंतरी छान खोलवर या क्षणीही आहे !!

नुकताच एका कार्यक्रमाला गेलो होतो. गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते ९४ वर्षे वयाच्या दादा जोशी यांचा सत्कार झाला. आनंदी जीवन कसं जगावं, याचा आदर्श म्हणजे दादा जोशी...दादांचा जीवनपट समोर उलगडत होता, तेव्हा इकिगाई पुस्तक आठवलं...

असं काय आहे इकिगाई पुस्तकात? आज सहज मनात विचार आला, की आपली 'इकिगाई' काय आहे?

ज्यांनी पुस्तक वाचलेलं नसेल, त्यांच्यासाठीः इकिगाईचा सोपा अर्थ म्हणजे तुमच्या रोजच्या जगण्यासाठीची प्रेरणा...रोजच्या जगण्याचं प्रयोजन...

हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिररस या लेखकद्वयाचे 'इकिगाई' वाचायला सुरूवात होते, तेव्हा ते मानसिक आरोग्याचं वर्कबुक वाटतं. पुस्तकाची पानं पुढं सरकू लागतात, तेव्हा नकळत आपल्या रोजच्या जगण्याशी त्याचा संबंध जोडायला सुरूवात होते. दीर्घायुषी, आनंदी स्वभावाच्या जपानी लोकांशी परियच होऊ लागतो, तेव्हा कुठंतरी तार जुळलेली असते. जगण्याची अगदी साधी-सोपी तत्वे 'इकिगाई' उलगडत जाते. शेवटच्या पानांवर येतो, तेव्हा मोजून दहा सूत्रेही 'इकिगाई' देऊन जाते. ही सुत्रे इथे मांडायला नकोत. त्यासाठी तुम्ही इकिगाई वाचायला हवं.

मला 'इकिगाई' आणि भारतीय प्राचीन परंपरा-संस्कृती यांच्यात कमालीचं साम्य आढळतं. भगवद् गीता ते ज्ञानेश्वरीचे पसायदान मला आपल्या संस्कृतीची 'इकिगाई' वाटते. निसर्गाशी एकरूप व्हा सांगणारे आमचे सण-सोहळे आणि दूर समुद्राकाठच्या ओकिनावामधल्या ज्येष्ठांची 'इकिगाई' यांच्यात मला साम्य दिसतं. जगत् गुरू संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, सखाराम महाराज अमळनेरकर अशा अनंत संतांची विठ्ठलभक्ती 'इकिगाई'च नव्हे तर काय...

शिक्षण क्षेत्रातील सातत्याने सक्रियतेतून, विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची संधी प्राप्त करून देण्याच्या प्रयत्नातून, संघटनात्मक कार्याच्या सक्रियतेतून, सामान्य व्यक्तींच्या समस्यांसाठी सतत क्रियाशील राहण्यातून 'इकिगाई'चा अनुभव येतोय, असं मला लक्षात येतेय...अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यात असताना एका वर्गात एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या बौद्धिकात सांगितलेले कायम स्मरणात राहीले. ते म्हणाले होते, 'सामाजिक जीवनात दुसऱ्याच्या आनंदासाठी जगा.' समोरच्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा आपल्याला सामाजिक कार्याची प्रेरणा देणारा अनुभव असला पाहिजे. वर्षानुवर्षे कार्यमग्न राहणं, समाधानी आणि संवेदनशील असणं आणि आनंदी राहणं सार्वजनिक कामाचा गाभा असला पाहिजे.

रोजच्या जगण्याची प्रेरणा अनुभवातून बदलते आणि तुमचा ध्यास बनते तेव्हा तुम्हाला 'इकिगाई' गवसते. अर्थात, ती तुमच्या-आमच्यात असते; फक्त तिला दिशा, चालना मिळायचा अवकाश असतो...

तुम्हाला तुमची 'इकिगाई' मिळालीय का...? शोधा तुमच्यामध्ये...या पुस्तकाच्या निमित्तानं...