नव्या भारताचा समाजहिताचा संवादः मन की बात
'मन की बात' हा जगाच्या राजकीय इतिहासातील अभिनव प्रयोग म्हणून नोंदला जाईल, याबद्दल मला ठाम खात्री आहे. ही खात्री अशासाठी आहे, की जगातील सर्वात मोठी आणि प्रगल्भ लोकशाही असलेल्या देशाचे नेतृत्व करताना समाजहिताच्या संवादाचे पूल कसे बांधावेत, याची शिकवण 'मन की बात' मधून पंतप्रधान श्री. नरेंद्र जी मोदी यांनी दिली. 'मन की बात' भारतीयांसाठी असली, तरी त्याचे पडसाद जगभरात उमटले, यावरून समाजहिताच्या संवादाच्या पुलाचे महत्व लक्षात यावे. तब्बल शंभर कोटी भारतीयांपर्यंत 'मन की बात' पोहोचली असल्याचे संशोधन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रोहतक या संस्थेने परवाच जाहीर केले. हा आकडा शब्दशः अफाट आहे.
श्री. मोदी जी यांनी ३ ऑक्टोबर २०१४ रोजी 'मन की बात' उपक्रम सुरू केला. समाज माध्यमांचे महत्व अचूक ओळखून त्याला विकासात्मक संवादाची दिशा मा. पंतप्रधान देऊ पाहात होते. भारतीय जनतेला राजकीय नेत्यांच्या भाषणांची सवय आहे; मात्र मा. मोदी जी करू पाहात असलेला प्रयोग नाविन्यपूर्ण होता. जनतेशी थेट बोलणे, तेही सातत्याने आणि जनतेनेच शोधलेल्या नविन संकल्पनांचा प्रचार-प्रसार करण्याचा हा प्रयोग. जनतेसाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती सर्वोच्च नेत्याने थेट जनतेलाच देण्याचा हा प्रयोग. भारतीयांनी पाहता पाहता या प्रयोगाला उचलून डोक्यावर घेतले आणि 'मन की बात' कोट्यवधी भारतीयांच्या हृदयाचा आवाज बनली.
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारा भाजप कार्यकर्ता म्हणून मला या संवादाचे अधिक महत्व वाटते. माहितीचा भडीमार चहूदिशांनी होत असताना जनतेला उपयुक्त अशी माहिती देणे, प्रयोगशीलतेला चालना देणे आणि विधायकतेचा खणखणीत पुरस्कार करणे मला अत्यंत महत्वाचे वाटते. 'मन की बात' हा सर्वार्थाने जनतेला सामावून घेणारा संवाद आहे, म्हणूनच कार्यक्रम महिन्यातून एका रविवारी कोट्यवधी भारतीय सहकुटुंब एेकतात. त्यावर चर्चा करतात. त्यातील आवाहनांना प्रत्यक्षात आणण्याचे काम करतात.
'मन की बात'मधून पंतप्रधान मा. मोदी जी यांनी एखाद्या भारतीयाच्या प्रयोगाची माहिती सांगावी, त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि साऱ्या भारताने त्या व्यक्तीला, संस्थेला 'सेलिब्रेटी' बनवावे असे प्रत्येकवेळी घडले. दूरची उदाहरणे आहेतच; पुण्यातही हा अनुभव आला. "अस्मि गम्मत कट्टा' युट्यूब चॅनलद्वारे लहान मुलांना लॉकडाऊनच्या काळात गोष्टी सांगणाऱ्या वैशाली देशपांडे-व्यवहारे साऱ्या भारतात प्रसिद्ध झाल्या. अमेय जोशींनी व्यक्त केलेली रस्ते अपघाताबद्दलची चिंता साऱ्या भारताची चिंता बनली. रोझलँड गृहनिर्माण संस्थेतील सभासदांनी केलेला जलसंवर्धनाचा प्रयोग 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासियांसाठी आदर्श बनला. एमएसआर-ऑलिव्ह गृहनिर्माण संस्थेतील सौरउर्जा प्रकल्प देशासाठी अभिमानाची बाब बनला. या संस्था, व्यक्तींवर अभिमंदनाचा वर्षाव तर झालाच; शिवाय त्यांना आणखी कामाची मिळालेली प्रेरणा निखळ आनंददायी आहे.
साध्यासुध्या माणसांमधील सकारात्मकता शोधून त्या सकारात्मतेचा प्रसार 'मन की बात'ने केला. सकारात्मकता पाझरत समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जायला हवी, यासाठी पंतप्रधान मा. मोदी जी यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून 'मन की बात' राजकारणापलिकडे पोहोचली. राजकारणाचा भाग म्हणून काहींनी या उपक्रमावर टीकाही केली; मात्र जनतेशी थेट नाळ जोडलेला, जनतेच्या हृदयाचा आवाज बनलेला नेता अधिक प्रभावी असतो, हे 'मन की बात'च्या देदीप्यमान यशाने सिद्ध केले.
ऑल इंडिया रेडिओची २६२ स्टेशन्स, खासगी आणि कम्युनिटी रेडिओची ३७५ स्टेशन्स, विविध वृत्तवाहिन्या, इंटरनेट रेडिओ अशा सर्व माध्यमांतून एका वेळी 'मन की बात'चे प्रसारण होते, तेव्हा भारताच्या विलक्षण एकात्मकतेची, राष्ट्रीय भावनेची साक्ष पटत जाते. त्यामुळेच, 'मन की बात' हा जनतेचा अफाट ताकदीचा, तरीही सुमधूर असा आवाज बनला आहे.
बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान असो किंवा आरोग्याचा संदेश असो किंवा जवानांप्रती कृतज्ञता असो, पंतप्रधान मा. मोदी जी यांनी 'मन की बात' मधून आवाहन करावे आणि कोट्यवधी भारतीयांनी त्यांना साथ द्यावी, असे अनेकदा घडले. भारताच्या इतिहासात पंतप्रधानपदावरील व्यक्तीने इतक्या सातत्याने, वैविध्यपूर्णरितीने, नाविन्यपूर्ण संकल्पनांसह जनतेशी संवादाचा भक्कम पूल बांधल्याचे दुसरे उदाहरण नाही. जगाच्या इतिहासातही नाही.
'मन की बात'च्या शंभराव्या भागाचे प्रसारण ३० एप्रिल २०२३ रोजी होत आहे. त्यापूर्वी, ९५ व्या भागात त्यांनी शंभराव्या भागासाठी संकल्पना सुचविण्याचे आवाहन केले. मी पाहिले, हजारो भारतीयांनी 'मन की बात'मधून मिळालेले लोकशिक्षण, समाजशिक्षण याबद्दल लिहिले. आचरणात आणलेल्या गोष्टींबद्दल लिहिले. हजारो तरूणांनी नव्या भारताचे, विश्वगुरू भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांच्या संकल्पना सादर केल्या. संकल्पनांची ही देवाणघेवाण बलशाली भारताच्या स्वप्नाकडे जोमाने वाटचाल करणारी आहे. 'मन की बात' कोट्यवधींच्या प्रेरणेचा स्त्रोत आहे. हा प्रेरणेचा स्त्रोत नव्या भारताच्या उभारणीत योगदान देतो आहे. ही प्रेरणा आणि योगदान सोबत घेऊन आपण सारे ३० एप्रिल रोजी 'मन की बात'च्या शंभराव्या भागाचे प्रसारण एेकावे, सहकुटुंब, मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि नव्या भारताच्या उभारणीतील आपला खारीचा वाटा उचलावा, असे मनःपूर्वक आवाहन आहे.