G-20

‘जी-२०’ परिषदेतून शाश्वत विकासाची पायाभरणी

‘जी २०’ अर्थात जगातील वीस प्रभावशाली देशांचा समूह किंवा गट. या समूहाची या वर्षीची-२०२३ ची परिषद विविधतेने नटलेल्या भारत देशात होत आहे. हा बहुमान नक्कीच अभिमानास्पद आहे. देशांना एकसंघता, शाश्वत विकास आणि समृद्धीच्या दिशेने नेणारा ठरणार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम् : एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही या परिषदेची संकल्पना आहे. याच संकल्पनेतून आणि दृष्टिकोनातून वातावरणासंबंधी आव्हाने, शांतता आणि शाश्वत विकासाच्या मार्गावरील आव्हानांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सांघिकरित्या मात करण्यासाठी एक ‘सर्वंकष आराखडा २०३०’ मांडण्यात आला आहे.

भारताने ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या जीवनमूल्यांच्या आधारे लोकसहभागातून नाविन्यपूर्ण आणि परिवर्तनशील असे सुप्रशासन आणि विकासाचे प्रारुप (मॉडेल) तयार केले आहेत. भारतीय प्रारुपात (मॉडेल) प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी घडवून आणले जात आहे. ‘जी २०’ च्या संपूर्ण कार्यप्रवाहांमध्ये विकासाच्या मुद्द्यांवरील भर वाढवून शाश्वत विकास घडवून आणण्याची प्रक्रिया अधिक गतीमान करण्याकडे भारताचे लक्ष राहणार आहे. महिला-नेतृत्व विकास, डिजिटल परिवर्तन आणि केवळ हरित संक्रमण आदी सर्व शाश्वत विकास गटांवर बहुआयामी प्रभाव टाकू शकतील, असे परिवर्तनशील क्षेत्रे आणि संक्रमणांवर विशेष भर असणार आहे.

जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या समस्यांचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्याचे नवे पर्व निर्माण होईल व सहमतीतून समस्या सोडविण्याचा मार्ग भारत देशाला दाखवेल असा विश्वास आहे.

इंडोनेशियातील बाली येथे पार पडलेल्या १७ व्या ‘जी-२०’ परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर जागतिक शिक्कामोर्तब झाल्यामुळे भारताची प्रतिष्ठा उंचावली असून जगातील प्रभावशाली राष्ट्रांचे नेतृत्व करण्याची संधी आता भारताला मिळाली आहे.

भारताकडे आलेले हे पद सर्वसमावेशक, महत्वाकांक्षी, निर्णायक आणि कृतिशील असणार आहे. पुढील एका वर्षात नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि सामूहिक कृतीला गती देण्यासाठी भारताच्या नेतृत्वाखाली जी-२० परिषद प्रमुख जागतिक प्रवर्तक म्हणून महत्वाची भूमिका बजावणार आहे.

विकासाचे लाभ जगातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाली येथील १७ व्या परिषदेत सोडला असून शांतता आणि सुरक्षिततेखेरीज या सूत्राचा लाभ जगाला मिळणार नाही. यासाठी ‘युद्धाला नकार आणि शांततेचा पुरस्कार’ ही पंतप्रधानांची भूमिका या परिषदेच्या सदस्य राष्ट्रांनी स्वीकारली असून त्यासाठी जागतिक पातळीवर जनमत उभे करण्याचे आव्हानही भारत सहज पार पाडेल.

‘२०३०’ चे उद्दिष्ट्य साध्य करण्याच्या दृष्टीने २०१५ मध्ये सुरु झालेल्या प्रवासाच्या मधल्या, निर्णायक टप्प्यावर भारताकडे ‘जी २०’ चे अध्यक्षपद आले आहे आणि संयुक्त राष्ट्रांनी अनुक्रमे २०२३ आणि २०२४ मध्ये आयोजित केलेल्या शाश्वत विकास गटाची शिखर परिषद आणि भविष्यासाठीची शिखर परिषद यांच्या समांतरपणे ही परिषद होत आहे. एवढंच नव्हे तर ही ‘अमृतकाळा’ची सुरुवात देखील आहे.

जी २० च्या निमित्ताने भारत मुख्यत्वे पुढील बाबीवर काम करणार आहे.

 • कार्यक्रमांचे वर्गीकरण करताना स्टार्टअप हा प्रथमच वेगळा गट विकसनशील देशांना आत्मनिर्भर करण्यावर विकास कार्य गटाचा भर असेल.
 • आर्थिक अडचणीतील देशांना अर्थसहाय्य करणे.
 • ५० कोटी नागरिकांचे आरोग्य संरक्षण देणे.
 • विकसनशील देशांमध्ये ‘डेटा’ संबंधित क्षमता-निर्मितीवर भर
 • हवामान कृती आराखड्यातील बाबींवर काम करणे.
१ डिसेंबर २०२२ पासून अधिकृतपणे जी-२० परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे भारताकडे आली आहेत. भारतातील ५६ शहरात २०० बैठका होणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे १४ सभा होणार आहेत. जगासमोरील आव्हानांचा मुकाबला एकत्रितपणे करण्यासंबंधीची भारताची वचनबद्ध भूमिका आणि यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने स्वीकारलेले पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे एकात्म मानवतावादाचे सूत्र, यांची सांगड घालून सर्वांना समान विकास आणि सामायिक भविष्याचा संदेश जगाला देण्याची संधी अध्यक्षपदामुळे भारताला मिळाली आहे. जगाच्या एकत्रित विकासासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करण्याचे आव्हान पंतप्रधानांनी संधी म्हणून स्वीकारले आहे आणि त्यातूनच जागतिक नेतृत्व करण्याची भारताची क्षमता सिद्ध होणार आहे.

जी-२० कार्यक्रमांतर्गत भारतभर पुढील गोष्टींचे नियोजन होत आहे.
 • कार्यक्रमांचे वर्गीकरण करताना स्टार्टअप हा प्रथमच वेगळा गट
 • महिलांद्वारे केल्या गेलेल्या विकासावर भर
 • २१व्या शतकासाठी बहुस्तरीय व्यवस्थांची निर्मिती
 • आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत स्थायी विकास
 • विविध राज्यांत कार्यक्रम आयोजित करताना प्रत्येक राज्याच्या संस्कृती व परंपरांचे दर्शन
महाराष्ट्रात होणार्‍या जी-२० बैठकीतील प्रमुख उद्देश पुढील प्रमाणे
 • कार्यक्रमांचे वर्गीकरण करताना स्टार्टअप हा प्रथमच वेगळा गट नागरिकांच्या जगण्याशी संबंधित गोष्टींची चर्चा केली जाईल
 • डिजिटल प्रगतीचे प्रदर्शन केले जाईल
 • जगाच्या दक्षिण गोलार्धाचा आवाज म्हणून भारताची प्रतिमा दाखवली जाईल
 • महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाईल
 • महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ, पोशाख, वस्त्रे यांची ओळख या निमित्ताने करून दिली जाईल
निसर्गाचा विश्वस्त असल्याच्या जबाबदारीची जाणीव मानवजातीला करून देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांस पाठबळ देण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जी-२० च्या निमित्ताने राजकारण, पक्षभेद बाजूला ठेवून सहभागी होवूयात.